माजी विद्यार्थी मेळावा ठरला स्नेहमिलनाचा सोहळा, शिवाजी हायस्कूलमध्ये आयोजन

कुरखेडा : येथील शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात शनिवार, १४ जून रोजी स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल ४२ वर्षांनी गुरु-शिष्यांनी एकत्र येत स्नेहमिलन सोहळा आयोजित केला होता. १९८३-८४, १९८४-८५ आणि १९८५-८६ या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमादरम्यान माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील मजेदार व भावनिक आठवणींना उजाळा दिला. शाळेतील खोड्या, शिक्षकांचे मार्गदर्शन, मैत्रीचे जुने क्षण आणि निरोप समारंभाच्या आठवणीने सर्वांना आपला भूतकाळ आठवला. मात्र, या शाळेने आयुष्याला दिलेल्या दिशेबद्दल प्रत्येकाने कृतज्ञता व्यक्त केली. या स्नेहमिलन सोहळ्याने माजी विद्यार्थ्यांमध्ये एक नवी उर्जा निर्माण झाली होती. त्यामुळे भविष्यातील पिढ्यांना प्रेरणा देणारा हा मेळावा ठरला. या सोहळ्यात जवळपास दीडशे माजी विद्यार्थी आणि त्यांचे गुरुजन एकत्र आले, ज्यामुळे शाळेचे प्रांगण पुन्हा एकदा गजबजले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश गौरकार होते. माजी विद्यार्थ्यांकडून गुरुवर्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. या स्नेहमिलन कार्यक्रमात उपस्थित गुरुवर्यांनी आपल्या मार्गदर्शनात जुन्या आठवणींना उजाळा देत म्हटले की, हा आनंद आम्हाला जगण्यासाठी प्रेरणा देईल, आमचे माझे विद्यार्थी म्हणजे माझी संपत्ती असून ही संपत्ती आम्ही नेहमी जोपासू, असे उद्गार सेवानिवृत्त शिक्षकांनी व्यक्त केले. ४२ वर्षांनंतर आपल्या वर्गमित्रांना आणि गुरुजनांना एकत्र आणणे हा एक भावनिक आणि आनंददायी अनुभव होता. १४ जून २०२५ रोजी सकाळी शिवाजी हायस्कूलच्या प्रांगणात भव्य शामियाना उभारण्यात आला होता. सकाळी १० वाजता दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची विधिवत सुरुवात झाली. सविता वाघरे यांनी स्वागतपर भाषणात सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि या स्नेहमिलनामागील उद्देश विषद केला. आम्ही फक्त वर्गमित्रच नव्हतो, तर एक कुटुंब होतो. आज पुन्हा तेच कुटुंब एकत्र आले आहे, असे त्या म्हणाल्या. सोहळ्याचा विशेष आकर्षण ठरला तो उपस्थित गुरुजनांचा सपत्नीक सत्कार. १९८३ ते १९८६ या काळात शिकविणाऱ्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडविण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्यांच्या योगदानाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी गुरुजनांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी अनेक गुरुजनांनी आपल्या विद्यार्थ्यांचे यश आणि हा स्नेहमिलन सोहळा पाहून आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाचे संचालन मनीषा भरणे व दामोदर अंबादे यांनी केले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी मनिषा भरणे, सविता वाघरे, दिलीप निरंकारी, विनोद सोनकुसरे, वीरेंद्र मोहबंशी, जयंत हरडे, किशोर तलमले, रवी पोलशेट्टीवार, निर्मला गोन्नाडे, निलीमा काळे, लीना आकरे, नामदेव बनसोड, अर्चना पांडव, चित्रलेखा लोणारे, प्रमोद उपासे, विलास आसुडकर, रमेश मडावी, मधुकर मेश्राम, दामोधर अंबादे, यशोधरा सहारे, वासुदेव बैहटवार, प्रेमचंद मच्छिरके आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाला सुरेंद्र चंदेल,विलास गावंडे ,विजय उदापूरे आदी उपस्थित होते.