समाजासाठी काम करा, हीच संताजींची शिकवण : न्या. प्रमोद तरारे, श्री संत जगनाडे महाराज जन्मोत्सव सोहळा

गडचिरोली : आपण कितीही मोठे झालो तरी ज्या समाजात आपण जन्म घेतला, त्या समाजाचे आपण काही देणं लागतो. समाजासाठी काम करणे हीच श्रीसंत संताजी जगनाडे महाराज यांची शिकवण आहे. त्यामुळे प्रत्येक समाजबांधवाने समाजासाठी काम करावे, असे आवाहन महाराष्ट्र विक्रीकर, न्यायाधिकरण मुंबईचे अध्यक्ष न्या. प्रमोद तरारे यांनी केले. शहरातील आरमोरी मार्गावरील श्री संताजी स्मृती प्रतिष्ठानच्या कार्यालयाच्या प्रांगणात शनिवारी (२७ डिसेंबर) श्री संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीने श्री संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव तसेच तेली समाजातील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संताजी स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा महा. प्रां. ते. महारासभा (दक्षिण) जिल्हाध्यक्ष प्रभाकर वासेकर, उद्घाटक नवनियुक्त नगराध्यक्ष ॲड. प्रणोती निंबोरकर तर प्रमुख अतिथी म्हणून संताजी स्मृती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष तथा महा.प्रां. ते महासभेचे जिल्हाध्यक्ष (उत्तर) प्रमोद पिपरे, शिक्षणमहर्षी भाग्यवान खोब्रागडे, कुनघाडा विश्वशांती कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. तुषार दुधबावरे, विदर्भ तेली महासंघाचे अध्यक्ष तथा संताजी स्मृती प्रतिष्ठानचे सचिव सुरेश भांडेकर, संताजी सोशल मंडळाचे अध्यक्ष प्रा. देवानंद कामडी, उपाध्यक्ष ॲड. रामदास कुनघाडकर, माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, अनिल कुनघाडकर, मुक्तेश्वर काटवे, रवींद्र निंबोरकर, गोपिनाथ चांदेवार, रमेश कांबळे आदींसह तेली समाजातील नवनियुक्त नगरसेवक उपस्थित होते. याप्रसंगी शिक्षणमहर्षी भाग्यवान खोब्रागडे यांनी समाजाचे संघटन बळकट असल्यास समाजाची प्रगती व विकास शक्य आहे. समाजात असलेली मतभिन्नता बाजूला सारून समाजाची एकत्रित यावे, असे आवाहन त्यांनी केले. तर प्रभाकर वासेकर यांनी समाज संघटनेवर भर देत तेली समाजाने संघटीत व्हावे, असे आवाहन केले. संचालन प्रा. रामचंद्र वासेकर तर आभार देवाजी सोनटक्के यांनी मानले. या सोहळ्याचे आयोजन महा. प्रांतिक तेली महासभा, संताजी स्मृती प्रतिष्ठान, विदर्भ तेली महासंघ, संताजी सोशल मंडळ, तेली सेवा समिती, श्री संताजी नागरी सह. पतसंस्था आदींच्या वतीने करण्यात आले होते. सोहळ्याला तेली समाजातील महिला, पुरुष, युवक-युवती, विद्यार्थी बहुसंख्येने सहभागी झाले होते. ............... माझ्या विजयात शहरवासीय व समाजाचे योगदान : ॲड. प्रणोती निंबोरकर नुकताच पार पडलेल्या गडचिरोली नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मी राज्यात मोठ्या मताधिक्याने निवडून आलेली पहिली नगराध्यक्ष आहे. माझ्या विजयात गडचिरोली शहरातील नागरिक व तेली समाजबांधवांचे मोठे योगदान आहे. संत तुकाराम महाराजांच्या गाथाचे श्रीसंत जगनाडे महाराज अमर रक्षक आहेत. श्री संताजी जगनाडे महाराज यांचे विचार समाजाने आत्मसात करावे, असे आवाहन नवनियुक्त नगराध्यक्ष ॲड. प्रणोती निंबोरकर यांनी केले.
