मुख्यपृष्ठ > District > वर्तमान बातमी

गडचिरोलीमध्ये भव्य तिरंगा यात्रा — 'ऑपरेशन सिंदूर' ला पाठिंबा देत देशभक्तीची सळसळती अभिव्यक्ती

BJP
२० मे, २०२५ रोजी ०३:१० PM
गडचिरोलीमध्ये भव्य तिरंगा यात्रा — 'ऑपरेशन सिंदूर' ला पाठिंबा देत देशभक्तीची सळसळती अभिव्यक्ती

गडचिरोली... शहरात आज देशभक्तीचा अभूतपूर्व उत्सव अनुभवायला मिळाला. हजारो देशभक्त नागरिक आणि विविध संघटनांनी एकत्र येत 'ऑपरेशन सिंदूर' च्या समर्थनार्थ भव्य तिरंगा यात्रा काढली. विशेष म्हणजे ही यात्रा भर पावसातही अत्यंत शिस्तबद्ध व उत्साहात पार पडली, ज्यातून उपस्थितांच्या देशप्रेमाची आणि निष्ठेची प्रचीती मिळाली. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे ७५ मीटर लांब भव्य तिरंगा, जो विद्यार्थ्यांनी आणि देशभक्त नागरिकांनी अभिमानाने खांद्यावर घेत संपूर्ण मार्गावर फडकविला. या दृश्याने उपस्थित सर्वांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. अलीकडेच पहलगाम (काश्मीर) येथे पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी हिंदू बांधवांची निर्घृण हत्या केली होती. यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानात घुसून 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करत ठोस व निर्णायक प्रत्युत्तर दिले. ही कारवाई केवळ प्रतिशोध नव्हे, तर भारताच्या दृढ आणि सक्षम सुरक्षा धोरणाची ठळक निशाणी ठरली. तिरंगा यात्रेमध्ये राजकीय नेते, पोलीस भरतीसाठी तयारी करणारे युवक, महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सहभाग नोंदवला. "भारत माता की जय", "वंदे मातरम्", "सैनिक के सन्मान में हिंदुस्तान हे मैदान", आणि "सुन ले बेटा पाकिस्तान, बाप है तेरा हिंदुस्तान" अशा घोषणांनी संपूर्ण गडचिरोली देशभक्तीच्या वातावरणात न्हालं. या कार्यक्रमाचा एक अत्यंत भावनिक आणि अभिमानास्पद भाग म्हणजे गडचिरोली जिल्ह्यात नक्षलविरोधी चकमकीत वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबियांचा सत्कार. त्यांना पुष्पगुच्छ, शाल-श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या बलिदानास मानवंदना देताना उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. यावेळी माजी खासदार अशोकजी नेते, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, प्रशांत वाघरे, बाबुराव कोहळे, हेमंत जम्बेवार, रमेशजी भुरसे, प्रमोद पिपरे, योगिता पिपरे, अनिल पोहनकर, अनिल कुनघाडकर, जिल्हाध्यक्ष गीताताई हिंगे, रेखा डोळस, अनिल तिडके, केशव निंबोड, डॉ. भारत खट्टी, गुरुदेव हरडे, अरुण हरडे, मनोज देवकुळे, प्रशांत भृगवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमातून गडचिरोलीवासीयांनी पुन्हा एकदा सिद्ध केले की — सीमा केवळ नकाश्यावर असते, पण देशभक्ती हृदयात असते. सैनिकांचे मनोबल उंचावत, भारताची दहशतवादविरोधी भूमिका ठामपणे जगासमोर मांडणारा हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला.

ही बातमी शेअर करा