इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन १७ नोव्हें. रोजी

गडचिरोली : विज्ञान व तंत्रज्ञान विभाग भारत सरकारच्या वतीने इन्स्पायर अवॉर्ड अंतर्गत गडचिरोली-चंद्रपूर जिल्हा विज्ञान प्रदर्शन १७ व १८ नोव्हेंबर रोजी 'डॉ. कमल रणदिवे विज्ञाननगरी' अनु. जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा नवेगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवार, १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक नीलोत्पल, साहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रणजित यादव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, समाजकल्याणचे साहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य बळीराम चौरे उपस्थित राहतील. समारोपीय कार्यक्रम १८ नोव्हेंबर रोजी होणार असून यावेळी अध्यक्षस्थानी शिक्षण उपसंचालक डॉ. माधुरी सावरकर तर प्रमुख अतिथी म्हणून समाजकल्याण साहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी, शासकीय विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत जाकी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य बळीराम चौरे, जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे, वरिष्ठ अधिव्याख्याता धनंजय चापले उपस्थित राहतील. १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता विज्ञानदिंडी काढण्यात येणार आहे. विज्ञान प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्य.) वासुदेव भुसे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) बाबासाहेब पवार, शिक्षणाधिकारी (योजना) डॉ. नितीन बच्छाव यांनी केले आहे.
